मागच्याच आठवड्यात आमच्या रुममेटने ऎलान केला की तो मिशी ठेवणार आहे, आणि हा हा म्हणता आठवड्याभरात त्याची मिशी उगवली सुद्धा, लोक स्त्री हट्टापायी काय काय करतील काही सांगता येत नाही, मिशीची फर्माईश त्याच्या would be ने केली होती हे वेगळे सांगायला नको.
मिशी ही प्रत्येक पुरुषाने कधी ना कधी ठेवली असतेच, खुप कमी लोक असतील की ज्यांना कधीच मिशी ठेवण्याचा मोह झाला नाही, आत्ता क्लिन शेव दिसणार्यांनी कॉलेजमध्ये असताना मिसरुड हे मिरवलेच असते. मिशी ठेवायला काही नाही पण ती मेंटेन करणे जमले पाहिजे, नाही तर काही मजा नाही. १०० लफडी असतात मिशी ठेवण्याची, समतोल साधावा लागतो, डावीकडे आणि उजवीकडे सारखीच मिशी पाहिजे नाही फार विचित्र दिसते, मग ही काम Expert कडुन म्हणजे न्हाव्याकडुनच करुन घ्यावी लागतात. आणि म्हणुनच हल्ली मिशी ठेवणारे तरुण खुपच कमी लोक दिसतात, at least शहरांमध्ये तरी, गावाकडे अजुनही तरुण मंडळी मिशा ठेवताना दिसतात.
मिशी बाबतीत आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर ती शोभली पाहिजे. बर्याच लोकांना मिशा शोभत नाही, ते मिशी का ठेवतात? तेच समजत नाही, पण काय आहे की एकदा एखाद्या माणसाने मिशी ठेवायला सुरुवात केली आणि ती मध्येच त्याने काढुन टाकली तर सुरुवातीचे काही दिवस फार विचित्र जातात, आपले टवाळ मित्र चार चौघात आपली कशी उडवतील हे वेगळे सांगायला नको, आणि त्याही पेक्षाही वाईट म्हणजे आजुबाजुच्या मुली आपल्याकडे बघुन फिदी फिदी हसतात, हे फिलिंगच खुप बेकार असते त्यामुळे मिशी कापुन कॉलेज / ऑफिसला येणे म्हणजे कठिण काम असते, मी सुद्धा मिशी ठेवली होती पण S Y BCom ला आल्यावर उडवुन टाकली आणि पुढचे ४ दिवस फार बेकार गेले, मित्रांनी तर हैराण करुन टाकले होते, आणि कधीही न बोलणार्या मुली सुद्धा अरे आज तु खुप वेगळा दिसतोय अस म्हणुन तोंडावर उडवायच्या, पण झाली सवय थोड्याच दिवसात.
जस मिशीचे तसच दाढीचे, हल्ली लोक फ्रेंच बीअर्ड वगैरे ठेवतात, पुर्ण दाढी असणारे (साधुबाबा टाइप) फार कमी दिसतात, मी कॉलेजमध्ये असताना दिल चाहता है रिलिज झाला होता, आणि आमिरच्या स्पाईक आणि गोटी दाढीने फुल्ल धुम केली होती, वर्गातले अर्ध्यापेक्षा जास्त लोक ही फॅशन मिरवत होते. हे ऑफिसवगैरे प्रकरण फार लवकर सुरु झाल्याने मला दाढी वाढवणे कधी जमले नाही, आमच्या ऑफिसमध्ये ते चालायचे नाही आत्तापण चालत नाही, खरतर दाढी ठेवण्याचा ऑफिसच्याकामाशी काय संबंध आहे पण नाही म्हणजे नाही, ती हौस मी Exam leave मध्ये पुर्ण करुन घ्यायची महिनोंमहिने दाढी नाही करायचो, परिक्षेला गेल्यावर आपल्यासारखेच आपले दाढीधारी मित्र भेटायचे आणि परिक्षा झाली की पहिले काम म्हणजे न्हाव्याच्या दुकानात जाणे, कारण ती दाढी आता एवढी वाढली असते की सामान्य ब्लेड कडुन काहीच होणे शक्य नसते.
भारतात तर मिशी हा एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे, गोलमाल चित्रपटाने तर (अमोल पालेकरचा) मिशीला ग्लॅमर मिळवुन दिले होते, त्यात उत्पल दत्त चा डायलॉग आहे, "मुछ तो मन का दर्पण है.. लाख रुपये की बात है" आणि सगळ्यात भारी म्हणजे, "जिसके पास मुछ नही उसके पास तो मन ही नही.." आमिरने मंगल पांडे मध्ये अक्क्डबाज मिशी ठेवली होती आणि आता डबंग मधली सलमानची मिशी कदाचित नाक्यावरच्या सगळ्या पोरांच्या चेहर्यावर दिसु लागेल (आता पब्लिकने तर त्याचा तेरेनाम कट कॉपी केला होता मिशी तर फारच छोटी गोष्ट आहे)
Actually मिशी शोभते का नाही हे कळण्याचा मार्ग नाही, आपले मित्र काही योग्य सल्लागार होऊ शकत नाही या बाबतीत, अस कुठल तरी स्टॅटिस्टिक मिळायला पाहिजे की किती टक्के मुलींना मिशीवाले नवरे / Boy friend चालतात म्हणजे काही विचार करता येईल, well अस Statistics तर फक्त व.पुं.चा Statistics मराठेच देऊ शकेल तो पर्यंत बघुया कोणी भेटतय का ते मिशी ठेवायला सांगणारे.
(Image: From google)











