दिवाळी नंतर आठवडाभर सुट्टी घेऊन मित्रांबरोबर गोव्याला गेलो होतो, तिथे काय काय केले ते detail मध्ये blog वर सांगणे तर काही शक्य नाही पण शक्य तेवढी जास्तीत जास्त मजा करण्याचा प्रयत्न केला, तो थोडा तोकडा पडलाच पण २-३ दिवसाच्या मानाने भरपुर मजा केली. ही आमची अशाप्रकारे गोव्याला जायची पहिलीच वेळ होती त्यामुळे बर्याच गोष्टी करायच्या राहिल्या कारण अनेक गोष्टी माहितच नव्हत्या, म्हणुनच पहिल्यांदी जाणार्यांसाठी थोडी माहिती लिहावी अस वाटल.
बुकिंग
गोव्यात जाण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Hotel आणि जाण्यायेण्याची टिकीट बुकिंग. आता सांगायचे झाले तर आपण तिकडे जाऊन सुद्धा हॉटेल शोधु शकतो; तुम्ही तिथे पाय ठेवल्या ठेवल्याच गाईड आणि एजंट तुम्हाला गराडा घालुन हॉटेल मिळवुन देतो अस सांगतील, त्यामुळे ते तितकेसे अवघड नाही पण मनासारखेच हॉटेल मिळेल अस नाही आणि उगाच प्रवासातुन उतरल्यावर हॉटेल शोध घेत बसणे कंटाळवाणे होऊ शकते, त्यामुळे travelguru, yatra.com, makemytrip वगैरे साइट्स वरुन हॉटेल बुकिंगकरणे सोईचे होऊ शकते. आम्ही travelguru वरुन हॉटेल बुकिंग केले होते आणि एक ok type हॉटेल आम्हाला कलंगुटला मिळाले होते. गोव्यात आपण रुमवर फक्त झोपायलाच येतो पण तरी सुद्धा एक चांगले हॉटेल असणे केव्हाही चांगले.
जाण्यायेण्यासाठी माझ्यामते तरी ट्रेन केव्हाही चांगली, आम्ही AC sleeper bus ने पुण्याहुन गेलो होतो आणि तो प्रवास काही फार चांगला झाला नाही, त्यामुळे मला रेल्वे कधीपण चांगला option वाटतो. रिजर्वेशन तेवढे लवकर करायला हवे नाही तर आहेच बर्याच बसेस. माझा एक मित्र पुण्याहुन कोल्हापुर आणि कोल्हापुरहुन गोवा अशा मार्गाने गोव्याला गेला होता ते सुद्धा आपल्या ST महामंडळाच्या गाडीने, त्यामुळे तो सुद्धा एक option होऊ शकतो. कोल्हापुर गोवा ६-७ तासांचा प्रवास आहे.
गोव्यातला प्रवास
गोवा पर्यटना़च्या दृष्टीने दोन भागात विभागला गेला आहे, नॉर्थ आणि साऊथ, आम्हाला दोन-तीन दिवसात जास्त दगदग करायची नव्हती म्हणुन आम्ही फक्त नॉर्थ गोवावर लक्ष केंद्रित केले होते. आता तुम्हाला डोक्याला काहीही त्रास न देता गोवा दर्शन करायचे असल्यास पणजीहुन एक दिवस साऊथ गोवा आणि एक दिवस नॉर्थ गोवा अशा बस ट्रिप organise केल्या असतात त्यात तुम्हाला सगळे मेजर पॉइंट्स दाखवले जातात. पण खर सांगायचे तर त्यात मजा नाही, गोव्यात फिरायला बाइक किंवा कार भाड्याने घेऊन फिरायला हवे. आम्ही पाच जण होतो आणि एक self driven i10 भाड्याने घेऊन आम्ही हिंडलो जो एक चांगला option होता. फक्त मेन बीचेस च्या इथे घाण ट्रॅफिक जॅम होतो जिथे वैताग येतो, पण चालायचेच. दुसरा option आहे बाइकचा, तिथे Activa पासुन बुलेट पर्य़ंत सगळ्या बाइक भाड्याने मिळतात, भाडे दुचाकीसाठी १५० ते २०० रुपये per day असते आणि ४ चाकी साठी ७००-८०० रुपये per day, आणि पेट्रोल आपले. आणि हो सगळ्यात महत्त्वाचे, गाडीची नंबरप्लेट पिवळी हवी नाहीतर ती गाडी घेऊ नका, घेतली तर नक्की पोलिस धरतील, आणि गाडी घेताना तिला कुठे डेंट वगैरे आहे का ते बघुन घ्या आणि त्या owner ला सुद्धा सांगा, आणि हो, त्या गाडीत पेट्रोल खुप कमी असते, त्यामुळे जवळचा पेट्रोल पंप कुठे आहे ते विचारा. खरतर गोव्यात रस्त्यावर सुद्धा पेट्रोल विक्री चालु असते त्यामुळे तात्पुरताची सोय होऊ शकते, अर्थातच ते पेट्रोल बाजार भावापेक्षा जास्तच दराने विकले जाते. आणि ते सुद्धा नको असेल तर सरळ साइटसिइंग साठी taxi करावी.
गोव्यात फिरायला आणखी एक स्वस्त मार्ग म्हणजे बस. तिथे गोव्याला बसेसची फ्रिक्वेंन्सी चांगली आहे आणि पणजी बस स्टॅंडवरुन तुम्हाला गोव्यात कुठेही जायला बस मिळु शकते. आणि त्या बसेस चांगल्यासुद्धा असतात, आम्ही शेवटच्या दिवशी गाडी सरंडर केल्यावर बसनेच फिरलो होतो आणि जो एक चांगला स्वस्त option वाटला.
काय बघावे ?
आम्ही नॉर्थ गोव्यात होतो तिथे बघण्यासारखे म्हणजे कलंगुट बीच, बागा बीच, वॅगेटॉर बीच, अंजुना बीच आणि अरंबोल बीच, त्या पैकी मला सगळ्यात जास्त आवडलेला म्हणजे अरंबोल बीच. अरंबोल भारी आहे आणि मेन म्हणजे तिथे पर्यटकांची भाऊगर्दी नसते, निवांत बेड घेऊन पडता येते, तिथे मस्त समुद्रकिनार्यावर खुर्च्या आणि छत्र्या लाऊन देतात आणि आपण मस्त तिथे पडुन राहावे दिवसभर, आणि हो सन स्क्रीन घेऊन जायला विसरु नका. ते आपल्याला तिथेच खायला प्यायला आणुन देतात. वॅगेटॉर आणि अंजुना पण चांगले आहेत, आणि वॉटर स्पोर्ट करायचे असल्यास बागा बीचला पर्याय नाही, त्या लोकांशी खुप नेगोशिएट करावे लागते नाही तर ते काहीच्या काही भाव लावतात, ग्रुप मध्ये नेगोशिएट केले तर चांगले. आणि एकालाच पकडु नका, तिथे खुप असतात त्यामुळे २-३ ठिकाणुन रेट घ्या आणि मग करा, (जे आम्ही केले नाही आणि गंडलो), बाकी बघायला वॉटर फोर्ट आहेत, त्यात आम्ही चापोरा आणि आग्युडा केला होता, आग्युडा चांगला आहे आणि चापोरा ठिक आहे, आणि हो तिथे एक सिंकोरीन बीच सुद्धा आहे, जिथुन डॉल्फिन पॉईंटला जाता येते, आणि आम्हाला तिथुन चक्क ६ डॉल्फिन दिसले होते, अर्थात हा नशिबाचा भाग आहे. जायला तिथे अनेक नाइट क्लब्स सुद्धा आहेत, मी जिथे गेलो होतो तो कोणाला सजेस्ट करणार नाही, त्यामुळे तिथे चौकशी केल्यास उत्तम. आणि हो ओल्ड गोव्याला नक्की जा तिथे खुप छान चर्च आहेत ते बघायला विसरु नका.
वेळ असल्यास गोव्यात एक बर्ड सॅंक्चुरी आहे डॉ. सलीम अली बर्ड सॅंक्चुरी म्हणुन तिथे जायचे असल्यास पणजीहुन ओल्ड गोव्याला जाणारी बस पकडावी आणि तिथुन रायबंदरचा स्टॉप सांगावा, रायबंदरला उतरल्यावर तिथुन नदीच्या पलीकडे जाण्यासाठी फेरी सर्विस आहे, ती फुकट आहे आणि नदीच्या पलीकडे एक बर्ड सॅंक्चुरीचे गवर्मेंटचे ऑफिस आहे, तिथे चौकशी केल्यावर अस लक्षात आले की शुक्रवारी तिथे गवर्मेंट बोटींना सुट्टी असते आणि फक्त प्रायवेट बोट चालु असते. आमच्या दुर्दैवाने ती प्रायवेट बोट सुद्धा रिकामी नव्हती त्यामुळे आम्ही तसेच हात हलवत परत आलो, गवर्मेंट बोट १२ जणांसाठी ९०० रुपये घेते, म्हणजे पर हेड रुपये ७५.
काय खावे ?
आणि हो, गोव्यात डोना पॉला आणि मीरामार बीच सुद्धा आहेत जे फर्जी आहेत, नाही बघितले तरी चालतात, आणि अजुन एक गोष्ट म्हणजे पणजी मध्ये संध्याकाळी असणारी नाइट क्रुज, जी बोर असते, आणि तिथे जनता गेली असते त्यामुळे ते मिस केले तरी चालण्यासारखे आहे. मला तिथे एक माणुस भेटला त्याच्या मते, गोवा हे भारतातले फॉरेन आहे, इथे फॉरेनर्स खुप दिसतात आणि इथे देशी पेक्षा विदेशी पर्यटकांना जास्त मान मिळतो हे मला जाणवले, अर्थातच ते साहजिकच आहे.
गोव्यातले लोक मला खुप चांगले वाटले, आम्ही इतक्यावेळेस तिथे पत्ता विचारला तरी तिथे कोणाच्याच कपाळावर आठी सुद्धा आली नाही. त्यांच्या कोंकणी उच्चारातल्या मराठीत त्यांचे बोलणे ऎकणे ही सुद्धा एक गंमतच असते. असो बाकी गोवा भारी आहे, तिथे कमी वेळात जास्त बघण्यापेक्षा, जास्त वेळात कमी बघितले तर ते जास्त चांगले होऊ शकते.










