मित्राच्या साखरपुड्याच्या निमित्ताने इंदोरला जाण्याचा योग आला, आता मित्राच्या साखरपुड्यासाठी इंदोर वगैरे एवढे लांब जाणे थोडे odd च वाटते, त्याच्या घरच्यांना स्वप्नातपण वाटले नव्हते की त्यांच्या मुलाचे मित्र पुणे-मुंबईहुन इंदोरला साखरपुड्याला येतील, पण आमच्यामते इंदोर वगैरेला पुन्हा येणे काही जमणे शक्य नव्हते, आता कोणी स्पेशली इंदोरला कशाला जाईल? म्हणुन आम्ही मित्र म्हंटले की जाऊन येऊ.
इंदोरच्या आधी उज्जैन लागते, म्हंटले की उज्जैन बघुन घेऊ, म्हणुन उज्जैनला आम्ही उतरुन उज्जैन बघायचे ठरवले. उज्जैन एक धार्मिक स्थळ आहे त्यामुळे तिथे भरपुर मंदिर आहेत, तिथे ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वर आहे, सुरुवातीस आम्ही त्याचे दर्शन घेतले. प्रत्येक देवस्थानाप्रमाणे इथे सुद्धा VIP दर्शनाची सोय होती, बाहेर उभे असलेले so called पुजारी भक्तांना केवळ १५० रुपयात direct दर्शन आणि केवळ १,१०० रुपयात पुजा वगैरे करुन देण्याच्या गोष्टी करत होते, आम्ही सामान्य भक्तांप्रमाणे अडिच तास रांगेत उभे राहुन भक्तिभावाने दर्शन घेतले.
![]() |
| Mahakaleshwar Temple |
नंतर उज्जैन मधल्या वेगवेगळ्या मंदिरांचे दर्शन झाले, सगळ्यात भारी म्हणजे तिथले कालभैरवाचे मंदिर आहे, आणि कालभैरवाचा प्रसाद म्हणजे चक्क "सोमरस"! तिथे पब्लिक दारुच्या सॉरी प्रसादाच्या बाटल्या घेऊन येत होते, आम्ही बाहेर जी मिळाली ती बाटली घेऊन आत गेलो, लोक मात्र महाग विदेशीच्या पण बाटल्या घेऊन आली होती, मंदिरात असलेल्या काल भैरवाच्या मुखवट्यावाटे प्रसाद आत जातो, तिथल्या लोकांच्या मते प्रसाद आत कुठे जातो हे आजवर कोणालाच सांगता आलेले नाही यावर बरेच संशोधन सुद्धा झालेले आहे आणि संशोधकांनासुद्धा याचा शोध लावता आलेला नाही अस इथले लोक खात्रीपुर्वक सांगतात. काल भैरव हा महाकालेश्वराचा सेनापती, त्यामुळे आधी सेनापतीचे दर्शन मग राजाचे घ्यायचे अस तिथे आम्हाला सांगितले. (आम्ही उलटे केले). इथे अजुन एक म्हणजे, लोक एकमेकांना भेटल्यावर Hi, hello ऎवजी जय महाकालेश्वर म्हणतात.
नंतर तिथे भर्तुहरी राजाची गुहा होती, जिथे राजाने तप केले होते. तिथे सिद्धवट होते, म्हणजे वडाचे झाड, ह्या झाडाबद्दल बर्याच आख्याइका सांगितल्या जातात, क्षिप्रानदीच्या तीरावर असणार्या इथे बरेच कर्मकांड चालते. इथे विशेष म्हणजे खडा नंदी होता, Generally आपण नंदी नेहमीच बसलेला पाहतो, पण इथे असलेल्या शंकराच्या मंदिराच्या बाहेर उभा नंदी दिसतो. अजुन एक वेगळे सांगायचे झाले तर इथे भारतातले एकमेव मंगळ ग्रहाचे मंदिर आहे, मंगळ ग्रहाची उत्पत्ती इथे शंकराच्या घामाने झाली अशी आख्याइका सांगतात. हे मंदिर मंगळ असलेल्या लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे, इथल्या लोकांच्या मते बच्चन कुटुंबीय इथे ऎश्वर्याच्या मंगळ शांतीसाठी इथे आल्याचे सांगतात. तिथल्या दुकानांमध्ये प्रीती झिंटाचा फोटो सुद्धा लागला होता. उज्जैनमध्ये सांदिपनींचा आश्रम आहे, जिथे कृष्ण आणि बलरामांचे शिक्षण झाले आणि हो सुदाम्याचे सुद्धा.
हे सगळे झाले देव दर्शनांबद्दल पण उज्जैन मध्ये खाण्यापिण्याची चंगळ आहे, विशेषत: पोहे!, एवढे चविष्ट पोहे मी आयुष्यात खाल्ले नाहीत, काय माहित काय टाकतात पोह्यांमध्ये नॉर्मल पोहेच दिसतात पण काही तरी वेगळे असते, आणि पोह्यांबरोबर जिलबी must आहे, पोहे आणि गरम जिलबी इतका सही नाश्ता क्वचितच खायला मिळतो, बाकी इथले मिठाया आणि नमकीन फेमस आहेतच पण पोह्यांची बात निराळीच होती. आणि हो इतके स्वस्त म्हणजे फक्त ६ रुपये प्लेट!
आणि इथे येण्याजाण्यासाठी डुक्कर रिक्षा आहे (ती रिक्षा खरोखरच डुकरासारखी दिसते) आमची एक टुर त्यातुन पण झाली.
इकडे MP मध्ये सरकारी बस वगैरे प्रकार दिसत नाही, सगळीकडे प्रायवेट बसच होत्या, आम्ही उज्जैनहुन इंदोरला जाणार्या बसमध्ये बसलो. महाराष्ट्रासारखेच इकडेपण आम्हाला या ५६ किमीच्या प्रवासात २-३ टोलनाके लागले. बाकी इंदोर तर महाराष्ट्रात आहे असच वाटत, इतकी मराठी आडनाव आहेत इकडे की आपण दुसर्याप्रदेशात आहोत अस वाटतच नाही, माझा मित्र सुद्धा मराठीच होता, त्यामुळे एवढ्या लांब येऊन सुद्धा कुठल्या तरी मराठी सोहळ्यालाच आलो अस वाटले. तो इकडे इंदोरमध्ये असलेल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या कॉलनीमध्ये राहतो.
साखरपुड्याला नाममात्र खाऊन आम्ही दुपारी ५६ दुकान या इंदोर मधल्या फेमस खाण्याची दुकाने असलेल्या एरियात गेलो, तिथे पावभाजी, पिझ्झा, आलु चाट, दही चाट, दही पापडी कोल्ड्रिंक आणि सॅंडविचेस एवढे सगळे खाऊन सुद्धा बिल केवळ २५० च आले. एवढी स्वस्ताई असताना, लोक इंदोर सोडुन पुणे-मुंबईत कशाला येतात मला अजुन कळलेले नाही. इथे लोकांचे राहणीमान खरोखरच चांगले आहे, हे एकदम निवांत शहर आहे, दुपारी पुण्यासारखीच इथली दुकानेसुद्धा १ ते ४ बंद असतात, आमच्या मुर्खपणामुळे आम्ही आदल्या दिवसाची संध्याकाळ उज्जैनमध्ये घालवली त्यामुळे इंदोरमधल्या बडा सराफा या प्रसिद्ध खाण्यापिण्याच्या ठिकाणी जाणे आम्हाला जमले नाही.
अशाप्रकारे आमचे २ दिवस भरपुर मजेत गेले, पण थोडेसे गालबोट मात्र परतीच्या प्रवासात लागले, एक AC स्लीपर व्होल्वोने पुण्याला यायला निघालो त्या व्होल्वोने इंदोर संध्याकाळी ७ वाजता सोडले आणि पुण्याला पोहोचायला दुपारचे १२ वाजवले आणि माझी आजची सुट्टी लागली, पण असो, खुप मजा आली, रेल्वेचे रिजर्वेशन मिळाले तर या भागात पण २ दिवसाची ट्रिप होऊ शकते हा नविन शोध लागला.











