दोन वेळेस रस्ता चुकुन, दोन वर्ष वाट पाहुन शेवटी तुंगचा आमचा ट्रेक यशस्वी झाला. ट्रेक झाल्यावर कळले की तो रस्ता शोधणे काही एवढ कठिण नव्हता, नीट शोधला असला तर रस्ता सापडतो, पण कोणीतरी ब्लॉगवर लिहिलेल्या अपुर्या माहितीच्या आधारे रस्ता शोधण्याचा प्रयत्न केल्याने मागच्या दोनही वेळेस तुंगचा सोपा असुन सुद्धा रस्ता नीट सापडला नव्हता आणि आमच्या कोणत्याच ओळखीच्याने हा ट्रेक केला नसल्याने रस्ता कोणाला विचारायचा तो एक प्रश्नच होता. मागे गावकर्यांना विचारले होते तर तुंगी ऎवजी तुंगवाडी अशा कोण्या गावाचा पत्ता आम्हाला सांगुन आमची दिशाभुल केली होती. हाईट तर अशी झाली होती की तुंगच्या शेजारी असणारा कोरीगडला आम्ही गेलो होतो पण तुंग मात्र सापडला नाही.
असो यावेळेस कोण्या भल्यामाणसाने गुगल मॅपवर तुंगला व्यवस्थित टॅग केले असल्याने रस्ता सहज शोधणे शक्य झाले.
पुण्याहुन कसे जाणार?
पुण्याहुन चांदणी चौकमार्गे सरळ expressway गाठायचा तिथुन सरळ लोणावळा exit मारायची, लोणावळ्यात शिरल्यावर सरळ सरळ जायचे, सरळ जाऊन अॅंबी व्हॅलीचा रस्ता पकडायचा, तो रस्ता कुमार रिसॉर्टच्या अलीकडुन डावीकडे वळले की सुरु होतो.
अॅंबी व्हॅलीच्या रस्त्याने सरळ जायचे, भुशी धरणावरुन सरळ जायचे, INS Shivaji लागते तिथुन रस्ता डावीकडे वळतो त्या रस्त्याने सरळ जायचे, रस्ता वळणावळणाचा आहे, मग टायगर पॉइंट लागतो, तिथुन सुद्धा सरळ पुढे जायचे, तिकडे Lion's point लागतो, तिथुन सुद्धा पुढे जायचे मग उजव्या बाजुला Cloud 9 resort लागते, त्या रिसॉर्टच्या डावीकडे तुंग गावाकडे जाणारा रस्ता लागतो, त्या रस्त्याने सरळ सरळ पुढे जायचे, रस्त्यात मध्ये Essar कंपनीचे गेस्ट हाऊस टाइप काहीतरी लागते (म्हणजे आपण बरोबर रस्त्यावर आहोत). त्या रस्त्याने जवळपास ६-७ किमी पुढे गेल्यावर तुंग गाव आहे, गावाच्या थोडेच अलीकडे डाव्याबाजुस वरती जाणारा एक डांबरी रस्ता आहे, त्या रस्त्याने जवळपास १०० मीटर गेले तर एक मोठे औदुंबराचे झाड लागते आणि एक हनुमानाचे मंदिर लागते. बास इथुनच थोडे उजवीकडुन गडाच्या वरती जाणारी वाट सुरु होते. वाटेने सरळ सरळ वर चढण्यास सुरुवात करावी मध्ये अजुन एक हनुमानाचे मंदिर लागते म्हणजे आपली वाट बरोबर आहे असे समजावे. जास्तीत जास्त १ तासात आपण गडावर असतो.
गडावर बघण्यासारखे तस काहीच नाहीये, आणि दाट धुके असल्याने आम्हाला बाकीचा पण काही नजारा दिसला नाही, फक्त समोर तिकोणा दिसला आणि शेजारी कोराईगड दिसला, धुके नसते तर लोहगड पण दिसला असता अस ऎकुन आहे. आणि हो मागिल बाजुस पवना धरणाचा view एक नंबर आहे.
अती उत्साही लोक या गडाबरोबर जवळचाच कोराईगड सुद्धा करु शकतात, कोराईगडासाठी सरळ मेन रोडला लागायचे आणि उजवीकडे लोणावळ्याला वळण्याऎवजी डावीकडे अॅंबी व्हॅलीकडे जायच्या रस्त्याने सरळ जायचे रस्त्यातच डाव्या बाजुस कोराईगड लागतो.
कुठे खायचे?
गडाखाली खायला काही मिळते अस मला वाटत नाही, गडावर पाणी पण स्वच्छ नव्हते त्यामुळे पाणी आणि खाणे बरोबर घेऊन गेलेत तर उत्तम.
अंदाजे खर्च
आम्ही माझी मारुती घेऊन गेलो होतो. चांदणी चौकापासुन जाऊन येऊन जवळपास १६० किमी होतात. त्यामुळे १० लिटर पेट्रोल लागले, जर सकाळी लवकर निघालो तर दुपारी जेवणाच्या वेळेच्या आत घरी पोहोचु शकतो म्हणजे बाहेर फक्त नाश्ता एवढाच खर्च आणि गडावर काही सटरफटर घेऊन गेलो तर तो खर्च. पण मेन खर्च कार वाल्यांना होतो तो म्हणजे टोल, हे टोलवाले लोणावळा पुणे १ वेळचा ९९ रुपये टोल घेतात, त्यामुळे जाऊन येऊन २०० चा बांबु. old highway ने ५० एक रुपये कमी लागत असतील एवढेच.
(Pics by Harshad Deshpande)














2 comments:
फोटू का नाही टाकले अजून ?
FB la taakala aahe album
Post a Comment