बरेचदा आपल्याला माहिती नसते की पिक्चर भिकार आहे त्यामुळे आपण तो बघतो आणि डोके फोड करुन घेतो, पण बरेचदा असे सुद्धा होते की आपल्याला माहिती असते की पिक्चर भिकार आहे तरी सुद्धा आपण तो बघतो काही वेळेस पर्य़ाय नसतो पण बरेचदा कीडा असतो की बॉस किती खराब असु शकेल तो पिक्चर चल बघुन घेऊ काही होत नाही. मी असे भरपुर पिक्च्चर बघितले आहेत आणि पुढे सुद्धा बघत राहिल यात काही वाद नाही.
आता सगळेच चित्रपट भिकार असल्याने त्याला काही रेटिंग देता येणार नाही, ते एकाच कॅटेगरितले आहेत ती म्हणजे "भिकार".
१. विवेक ओबेरॉयचा प्रिन्स :- प्रिन्स चित्रपटात आपल्या हिरोची सगळी मेमरी एका चिपवर कॉपी (नव्हे कट - पेस्ट) करुन टाकतात आणि त्याच्या डोक्यात आता काहीच राहात नाही आणि सगळे येऊन त्याला गंडवत बसतात. आणि नंतर काही तरी होऊन ती मेमरी पुन्हा त्याच्या मेंदु मध्ये कॉपी करतात आणि त्याला सगळे आठवते आणि तो व्हिलनचा बदला घेतो. एवढी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी बघितल्यावर माझ्याबरोबर बसलेल्या दोन इंजिनिअर लोकांनापण घाम फुटला आणि हो सांगायचे राहिले की ती मेमरी नुसती कॉपी नाही केली तर ती समोरच्या टिव्ही वर दिसत सुद्धा होती एकदम खुल्ला हे तर काहीच नाही मेमरी कॉपी करायला मेंदु वगैरे पण काही उघडला नव्हता फक्त मानेवर ती चिप ठेऊन दोन चार बटन दाबली की झाले. दोन तास डोके दुखत होते पिक्चर बघितल्यावर.
२. राज कुमार चा तिरंगा :- आता १५ ऑगस्ट येतोय त्यामुळे कुठे ना कुठे तरी तिरंगा लागलाच असेल. देशप्रेम वगैरे ठिक आहे पण तिरंगा चित्रपट ओळखला जाईल तो ब्रिगेडिअर सुर्यदेव सिंगमुळे (आयला नाव पण आठवते राज कुमारचे). काहीच्या काही गोष्टी दाखवल्या आहेत, स्टोरी काही तरी वेगळीच चालुए आणि राजकुमार काही भलतच करतोय. जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला चकित करु शकत नाही या आविर्भावात राज कुमार वावरतो आणि त्याचे ते usual जानी वगैरे वगैरे डायलॉग मारतो. त्यात त्यांनी काही कमाल उपकरणे दाखवली आहेत, त्याच्या अॅंबेसॅडर मध्ये बॉंब लावला असतो तर एक बिप असा आवाज वाजतो आणि त्याची गाडी खालुन उघडते(!!!) आणि ते बाहेर पडतात. त्यानंतर मिसाईल कंडक्टर म्हणजे मिसाईलचा एक खुप महत्त्वाचा भाग (जो आपल्या फॅनच्या कपॅसिटर सारखा दिसतो) तो हे साहेब काढुन घेतात त्यामुळे मिसाईल उडतच नाही आणि आपला देश वाचतो. हे आणि असे अनेक प्रसंग या चित्रपटात आहेत.
३. सोहेल खानचा I - Proud To Be An Indian :- मी हा पिक्चर का बघितला हा प्रश्न मला अजुनही सतावतोय. माठ चेहर्याचा हिरो आणि त्यापेक्षाही माठ चेहर्याचा व्हिलन आणि त्यात घुसवलेली अनेक पात्र, स्टोरीचा पत्ता नाही कस काय हा पिक्चर बनवला असेल कुणास ठाऊक. आपला हिरो लंडनला जाऊन तिथल्या वंशभेद करणार्या गॅंगच्या विरुद्ध उभा राहतो आणि त्यांना धडा शिकवतो अस काहीस वाटत तो सिनेमा बघुन. अतिशय रटाळ आणि बिनडोक पिक्चर आहे आणि सगळ्यात जास्त डोक्यात जातो तो म्हणजे सोहेल खान त्याला अॅक्टिंगची गंधवार्ता नाहीये आणि डायलॉग डिलिव्हरी शुन्य आहे, पैसा असला की गाढवसुद्धा कसे हिरो बनते हे बघायचे असल्यास हा पिक्चर बघा.
४. सनी देओलचा बिग ब्रदर :- आम्ही हा चित्रपट रितसर भाड्याने CD आणुन बघितला होता, ह्या पिक्चरची CD मागितल्यावर दुकानदार सुद्धा हादरला होता आणि पिक्चर बघितल्यावर आम्ही हादरलो होतो. तर दिल्ली मध्ये सनी देओल महिलांना त्रास देणार्या सगळ्यांना धडा शिकवत असतो आणि खुप फेमस होतो पण अनेक घडामोडींमुळे तो मुंबईला येतो आणि रिक्षा चालवायला लागतो आणि त्याची बायको असते प्रियंका चोपडा (कस शक्य आहे). सगळ्यात डेंजर असते ती म्हणजे फरिदा जलाल ती सनी ची आई दाखवली आहे आणि तीच सनी देओलला भडकवत असते याला मार आणि त्याला मार म्हणुन, सनी देओलच तो कसला सोडतोय काढतो धुऊन खालचा व्हिडिओ बघा कळेलच. अर्थहीन पिक्चर होता.
५. मिथुनचा गुंडा :- आता गुंडा हा चित्रपट भिकार आहे अस जाहिरपणे सांगण्यात गट्स लागतात कारण गुंडा चित्रपटाला IMDB वर ७.६ ची रेटिंग आहे (आणि डबंग ला ६.५ ची आहे) गुंडाचे असंख्य फॅन आहेत आणि त्याचे बरेच फॅन क्लबसुद्धा आहेत त्यामुळे ही ब्लॉगपोस्ट त्यापैकी कोणी वाचली तर मला नक्कीच जीवाची काळजी करावी लागेल. गुंडाला कल्ट क्लासिक म्हणतात. पण त्याच्याइतका अश्लील अर्थहीन आणि भिकार चित्रपट मी पाहिला नाही (पिक्चर बघायला मजा आली यात वादच नाही) पण काय ते डायलॉग "मेरा नाम है बुल्ला और रखता हु मै खुल्ला" आणि अजुन काही डायलॉग बघायचे असतील तर ही लिंक बघा http://greatbong.net/2007/06/20/gunda-the-legend/
मी खुप अपेक्षा ठेऊन मित्रांना जमा करुन गुंडाची CD घेऊन घरी आलो आणि पुढचे २-३ तास तो सिनेमा बघुन आम्ही सुन्न झालो. काव्यमय डायलॉग आणि अशक्य स्टोरी आणि मिथुन, (well मिथुन पेक्षा तर त्यातले व्हिलनच जास्त भाव खाऊन जातात). माझ्या एका मित्राने फेसबुकवर स्टेटस टाकले होते (very excited to watch Mithun's Gunda.. cant wait) पिक्चर बघितल्यावर त्याने आधी तो स्टेटस काढुन टाकला. अजुनही गुंडा म्हंटल की ते सगळे व्हिलन डोळ्यासमोर येतात आणि कानात त्यांचे intro डायलॉग वाजायला लागतात.
लिस्ट खुप मोठी आहे पण सध्या एवढेच आठवत आहेत. असो पण ही लिस्ट वाढत जाणार हे नक्की.















10 comments:
गुंडा आणि भिकार? उद्याची पोर्णिमा तुमच्यासाठी अशुभ असावी. जपून रहा.
तुमच्या लिस्ट मध्ये तर माझे नाव (जन्म तारिख) दिसत नाहीये.. :) तरीपण मी जपुनच राहणार आहे
हॉस्टेल लाईफमध्ये असताना चित्रपट पाहणे हा एकच विरंगुळा होता. तर मी पाहिलेले प्रमुख भिकारपट असे ---
1 रामगोपाल वर्मा की आग
2 -निल & निकी
3 - ढाई अक्षर प्रम के
4 - आम्ही सातपुते
5 - बस इतनासा ख्वाब है
6 - बेकाबू ( हा शाऴोत पाहिला होता)
7 - राजनिती
8 - ऑलवेज कभी कभी ( मी पाहिलेल अलिकडचा भिकारपट )
गौरव,
ऑल सेड ऍन्ड डन.. गुंडा इज ऍन अनइंटेन्शनल मास्टरपीस..
त्यातली डायलॉग रायटिंग कितीही बीभत्स असली तरी त्यामागची प्रतिभा (आणि मी सिरियसली बोलतोय.. बीभत्स लिहिण्यासाठीही प्रतिभा लागतेच) आणि टारगेट ऑडियन्सकडे बघून लिहिलेले सीन्स यांना दाद द्यावीच लागेल..
राहता राहिलं तो भिकार असणं.. इट्स अ पर्स्पेक्टिव्ह.. इट हार्डली मॅटर्स...
वाईट ह्याचंच वाटलं की बाकीच्या सिनेमांच्या पंक्तित गुंडाला बसवलं गेलं... गुंडा कसाही असला (आमच्यासाठी भारीच तरी) त्यानं एक युग सुरू केलं... अगदी आजचे दबंग, वॉन्टेड ही सगळी तीच जातकुळी आहे...
तिरंगा हा माझा ऑल टाईम फेव्हरेट कल्ट आहे.. ब्रिगेडिअरचं अतिलार्जर दॅन लाई पात्र फक्त तोच करू शकतो.. आणि भाऊ, वाट्टेल ते करू शकणारा परदेशी बॉन्ड आपल्याला चालतो, पण देशी ब्रिगेडिअर चालू नये? आणि बिग ब्रदरबद्दल सहमत.. फरीदा जलालला त्या पात्रात बघण्याची गंमतच काही और आहे.. मजा आलेली आम्हाला तो सिनेमा बघायला...
बाकींबद्दल नो कॉमेंट्स..
बाकी... ' cant wait ' हे स्टेटस सिनेमा बघून झाल्यावर कुणीही काढूनच टाकेल :P
आपले मतभेद सोडले तरी लेख उत्तम झाला आहे ह्यात वाद नाही :)
@ द प्रोफेट :- कमेंट बद्दल आभार..गुंडा बद्दलची तुमची प्रतिक्रिया अपेक्षित होती. actually, गुंडा बघण्याची प्रेरणा मला तुमची पोस्ट वाचुनच मिळाली, तुमची पोस्ट आणि अनेक ब्लॉगवर गुंडाची एवढी प्रशंसा केली होती की मला तो बघण्याची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि मी खुप जास्त होप्स घेऊन तो पिक्चर बघितला आणि खुप जास्त अपेक्षा ठेवली की जे व्हायचे तेच होते.
@ ओंकार :- कमेंट बद्दल आभार..रामगोपाल वर्माची आग बघण्याची हिंमत झाली नाही, बाकी चित्रपट सुद्धा बघण्याची वेळ आली नाही (देवाच्या कृपेने) राजनिती मला एवढा टाकाऊ वाटला नाही.
गौरव,मी ह्यास भिकार म्हणणार नाही पण माझ्या माहिती प्रमाणे शबाना आझमीचा परिणय हा सिनेमा फर्स्ट डे सेकंड शो लाच पुण्यातील नटराज टॉकिज मधून प्रेक्षका अभावी उतरविण्यात आला होता असे काहीसे स्मरते.पहिल्या दिवशी सुद्धा सेकंड शोची फक्त ३ ते ४ तिकिटेच विकली गेली होती.तो सिनेमा चांगला होता का वाईट हा खूप नंतरचा प्रश्न आहे पण निर्मात्याला काय मानसिक यातना झाल्या असतील ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही.
आणि भिक्कार जर म्हणशील तर अमिताभ-जयाचा "एक नजर" ला मी प्रथम पारितोषिक देईन.संपूर्ण अडीच तीन तास दीनवाणा,बद्धकोष्ठ झाल्या सारखा चेहरा केलेला नायक म्हणजे अमिताभ नि वारांगनेच्या भूमिकेत जया भादुरीला बघणे म्हणजे एक वेळ फासावर लटकणे सुसह्य वाटण्या इतपत सिनेमा तद्दन भिकार होता. मुळात जया भादुरी हि कुठल्या तरी अँगलने वेश्या दिसू शकेल /वाटू शकेल काय ? पण नाही निर्मात्याच्या कुंडलीत त्या वेळी पराकोटीचे अशुभ ग्रह ठाण मांडून बसले असावेत त्या मुळे बिचाऱ्याला "नजर " लागली असावी नि त्याने ह्याची निर्मिती केली.जया भादुरी त्या वेळी मोठी स्टार असल्याने नि अमिताभ तिची सावली असल्याने केवळ तिच्यामुळे हा त्या वेळी/काळी तरला.जंजीर बिन्जीर हा नंतरचा इतिहास आहे.पण वास्तवता मात्र अशी होती कि बॉम्बे टू गोवाचे दिल्लीतील थंडे स्वागत बघून अमिताभने येथून गाशा गुंडाळायला घेतला होता हि वास्तवता आहे.नंतर अमिताभ पर्व आल्यावर "देखाना हाय रे सोचा ना " नि मेहमूद मुळे सुद्धा मॅटिनीला त्याने धमाल उडविली पण "पत्ता पत्ता बुटा बुटा "(मो.रफी ,लता) हे गाणे "एक नजर "ला मात्र वाचवू शकले नाही.
गुंडा सोडले तर बाकी सर्व चित्रपटाबद्दल मी तुमच्याशी सहमत आहे. गुंडा या साठी सोडला आहे कारण तो मी अजुन बघितला नाही ये, पण ईथला प्रकार बघुन मला आता तो पटकन बघावासा झाला आहे.
after this sunday you will be able to add Ra.One to this list..
तिरंगा सिनेमा चे नाव यात नसायला पाजे होते असे मला वाटते !!!
Post a Comment