तुम्ही इंग्लंड विरुद्धची सिरीज गमावली आणि नंबर एकचा किताब सुद्धा घालवला. आता तुम्ही कारण सुद्धा द्याल, हवामान असे होते आणि पिच अशी होती आणि टॉस तसा होता आणि अंपायर तसे होते. असो कारण काहीही असले तरी मुद्दा असा आहे की ही सिरीज तुम्ही गमावली आणि ती सुद्धा अगदी तोंडावर आपटुन, आत्ता तरी ३-० आहे पण ४-० सुद्धा होऊ शकते.
खेळ म्हंटला तर हार - जीत असतेच, आता भारतीय चाहते जरा संयमी आहेत त्यामुळे ही मालिका गमावली तरी तुम्हाला आम्ही काळ फासणार नाही किंवा क्रिकेट बघण सोडुन सुद्धा देणार नाही, हां काही दिवस आम्ही ते स्पोर्ट्स पेज नाही वाचणार आणि क्रिकेटची बातमी आली की चॅनेलसुद्धा चेंज करुन टाकु पण पुढची टेस्ट मॅच असली तर ३:३० ला (ऑफिसमध्ये असल्या कारणाने) क्रिकेट ची साईट उघडु आणि बघु काय चालले आहे ते, कितीही म्हंटले तरी राहवल तर नाहीच जाणार. शेवटी वर्ल्डकप जिंकण्याचा आनंद तुम्हीच दिला होता आम्हाला आणि त्यापेक्षा सुद्धा पाकिस्तानला हारवले होते आणि ऑस्ट्रेलियाला सुद्धा, आणि हे काही अजुन विसरलो नाहीत आम्ही, त्यामुळॆ तुम्हाला आम्ही सपोर्ट नाही करणार अस तर नाहीच होणार.
पण वाईट वाटते एका गोष्टीचे, वेस्ट इंडिजला हारवुन तुम्ही स्वत:ला फार महान समजु लागले आहात का? तुमचे बोटावर मोजण्याइतके खेळाडु सोडले तर कोणीच फॉर्ममध्ये नव्हते, तरी सुद्धा तुम्ही हवा करत होतात. जर तुम्हाला माहिती होते की वर्ल्डकप नंतर लगेच २-३ महिन्यात इंग्लंडचा दौरा आहे तर सर्व महत्वाच्या खेळाडुंना IPL खेळण्याचा मोह का व्हावा? सेहवाग, गंभिर, युवराज आणि जहिर हे IPL मध्येच injured झाले होते ना? देशप्रेम वगैरे सगळे संपले का तुमचे? जर इंग्लंडचे खेळाडु IPL मधे न खेळता (आता त्यांना नाही घेतले म्हणुन ते नाही खेळले तो भाग वेगळा) त्यांच्या श्रीलंके विरुद्धच्या सिरिजची तयारी करु शकतात तर भारताचे खेळाडु वेस्ट इंडिज लिंबु टिंबु म्हणुन तिथे जायला नाही म्हणतात आणि IPL खेळतात आणि तिकडेच पडतात धडतात.
एकच गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्याचा तुम्हाला माज चढला होता, तुम्हाला वाटले की आता आपल्याला काहीच रोखु शकणार नाही, IPL मध्ये मिळणारे पैसे तुम्हाला दिसत होते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही प्रतिस्पर्ध्याला कमी लेखण्याची चुक केली होती आणि त्यामुळे ३-० चा मानहानीकारक पराभव. असो झाल गेल विसरुन सुद्धा जाऊ पण आता डिसेंबर मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा येतोय, फक्त ४ महिने उरले आहेत काही होणार आहे का तुमच्या कडुन?? लवकर काही तरी करा इंग्लंड कडुन ३-० ने मात खाण्याइतकी वाईट परिस्थिती तर नक्कीच नव्हती, पण आता झाले ते झाले, ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात देशात तुम्ही हारवले तर त्याच्या सारखी दुसरी गोष्ट नाही होणार नाही. आणि काळजी करु नका सर्व चाहते अजुन सुद्धा टीम इंडियाच्या पाठिशी आहेत फक्त वाट पाहात आहोत ते एका चांगल्या परफॉर्मन्सची..
टीम इंडियाकडुन नेहमीच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा करणारा
एक निस्सिम चाहता










5 comments:
"आणि काळजी करु नका सर्व चाहते अजुन सुद्धा टीम इंडियाच्या पाठिशी आहेत फक्त वाट पाहात आहोत"
गौरव वाईट वाटून घेऊ नकोस पण नाही...... आम्ही नाही त्यांच्या पाठीशी..........ज्या टीम मधील २५-५०-१०० टेस्ट खेळलेले बोलर्स,नियमित पणे जिथे साधे गुड लेंग्थबॉल टाकू शकत नाही ती टीम नंबर वन टीम बनते/बनू शकते हाच मुळात फार मोठा विनोद आहे पण असो क्रमवारी पुढे काही बोलणे नाही.त्या मुळे अगदी बांगला देश विरुद्ध खेळताना सुद्धा दोन्ही डावातील मिळून २० विकेट्स कुणी,कशा नि कधी काढायचा हा परंपरागत प्रश्न आहे.
त्या मुळे पाहुण्यांनी जेवायला बोलावल्यावर प्रमुख मेनू पूर्ण पणे बिघडून सुद्धा फक्त त्या मेनुतील चांगल्या झालेल्या बटाट्याची भाजी व पुरीवर आडवा हात मारून,नंतर जेवण/स्वैपाक छान झाला,असे म्हणायचा प्रघात असतोच कि त्या प्रमाणे आत्ता पर्यंत सेहवागचा धडाका,सचिन,राहुल,लक्ष्मणची बॅटिंग आम्ही पाहत आलोय हि वास्तवता नि कटू सत्य आहे. मात्र ह्या वेळी बटाट्याची भाजी सुद्धा बिघडली नि पुऱ्या पण वात्तड झाल्यात,त्या मुळे पानावरून अर्ध्यावर उठावे लागले.
३-० नंतर चौथी टेस्ट म्हणजे आमच्या दृष्टीने यजमानाने जेवणा नंतर ठेवलेले मसाला पान आहे.आता निदान ते तरी थोड रंगतंय का ते आता बघायचं ! अन्यथा बाहेर पडल्या वर स्वतःचे तोंड स्वतःच्या हातानेच रंगवून घ्यायचे नि दुसरे काय? :)
मी पण टीम इंडियाच्या पाठिशी आहे..
गुड लक टीम इंडिया!!!
गौरव,
चवथ्या टेस्टच्या आधीची वरील बत्तीशी खरी ठरल्याचा आज बिलकुल आनंद नाहीये.पण वास्तवाला सामोरे हे शेवटी जावेच लागते. असो.
खरे तर सेहवाग,सचिन,द्रविड नि लक्ष्मण हे अजून किती वर्षे खेळू शकतील हा मोठा प्रश्नच आहे, नि मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोट्या झाडांचे डेरेदार वृक्षात कधीच परिवर्तन होऊ शकणार नाही हि वास्तवता आहे.थोडक्यात म्हणजे आपल्याला आता पुन्हा नव्याने सायकल शिकावी लागणार,नि ती शिकताना दोन चारदा आपटी हि खावीच लागणार आहे.'नवा गडी, नवा राज'
बँकेच्या खात्यातून समोरच्या पार्टीला दिलेला चेक, अन तो सुद्धा गाडीच्या अथवा हौसिंग लोनच्या ई एम आय सारखा, अगदी पार बाउन्स होण्या इतपत वेळ आल्यावर "त्या खातेदाराची" जी तारांबळ उडते तशी काहीशी अवस्था भारतीय निवड समितीची येत्या काही वर्षात झाल्यास त्यात आश्चर्य वाटणार नाही.
ताजा कलम,
भज्जी,युवराज आणि झहीर ह्यांनी त्यांच्या वर सध्या आलेली वेळ हे संकट न मानून ती इष्टापत्ती समजावी आणि केवळ त्यांचे ग्रह सध्या खूप उच्चीचे असल्याचे जाणून घेऊन/समजून घेऊन ,योग्य त्या वधू-वर संशोधन केंद्रात नाव नोंदवून, त्वरित "वधू संशोधनाचा" एक कलमी कार्यक्रम हाती घ्यावा व वेळेचा सदुपयोग करून दोनाचे चार हात करावेत अशी त्यांना प्रेमाची तंबी आहे,अन्यथा नाव नोंदवायची वेळ जाऊन ते सरते शेवटी हातावर गोन्दवायची वेळ येऊन ठेपेल कि "आम्हाला लग्ना साठी मुलगी/बाई द्या हो" म्हणून.खास करून भज्जीने हे लक्षात ठेवावे कि त्याचे चाहते हे त्याचा किमान एक तरी चेंडू कधी तरी वळेल ह्या आशेने अजून वर्षानुवर्षे त्याचा खेळ पहात थांबू शकतील पण मुली ते पेशन्स दाखवू शकणार नाहीत.त्यांच्या साठी "तू नही तो और सही " हा ऑप्शन अगदी खुल्ला आहे:))
भारत ४-० ने हारणार हे ३-० झाले तेव्हाच समजले होते, काहीही तयारी न करता पेपरला बसायचे आणि आपण मेरिट फाडुन बाहेर येऊ असा विश्वास बाळगायचा तर जे होणार असते ते असेच असते. मला वाटते की अस व्हायलाच हवे होते, मी याचा दोष फक्त खेळाडुंना देणार नाही, आपले बोर्ड तेवढेच जबाबदार आहे आणि हो सिलेक्टर सुद्धा. वर्ल्डकप, IPL, इंग्लंड दौरा ( इंग्लंड मध्ये अजुन ७ वन डे खेळणार आहेत ही लोक म्हणजे नाचक्की अजुन बाकी आहे), लगेच ती चॅंपियन्स लीग आणि त्यानंतर पुन्हा इंग्लंड बरोबर खेळायचे हे सगळे होई पर्यंत ऑक्टोबर संपणार आणि नोव्हेंबर एक मध्ये सोडला तर डिसेंबरमध्ये पुन्हा जायचे ऑस्ट्रेलियामध्ये माती खायला कस होणार, इकडे तुमचे बेंचवर कोणीच नाहीये, इंग्लंडमध्ये अभिनव मुकंद ऎवजी जाफरला का नाही नेले, अरे पार्थिव पटेल किंवा दिनेश कार्तिक सुद्धा चालला असता, आणि फक्त एकच स्पिनर का तो पण फॉर्ममध्ये नसलेला हरभजन, सेहवाग आणि गंभिर, युवराज जखमी असताना त्यांना का खेळवायचे? असे अनेक प्रश्न आहेत ज्याची उत्तरे धोनीला सुद्धा माहिती नसतील.
असो, आपल्या टीमचे माहिती आहेना माती खाल्ल्याशिवाय त्यांना पक्क्वान्ने गोड लागायची नाहीत मागे सुद्धा २००७ च्या वर्ल्डकपला तोंडावर आपटले पण नंतर आले ना लाइनीवर, हां अर्थातच यावेळेस ते एवढे सोपे नसणार कारण एकदा का राहुल, सचिन आणि लक्ष्मण गेले तर त्यांची जागा भरुन काढायला अजुन तर कोणीच दिसत नाहीये, रैना, कोहली आणि शर्मा तर मला नाही वाटत बाहेरच्या पिचेस वर काही करु शकतील ते.
आणि राहिली काळजी भज्जी,युवराज आणि झहीरची तर खरच आहे, धोनी आपला शहाणा निघाला शिस्तीत लग्न उरकुन घेतले, आता लवकर काही झाले नाही तर तुम्ही म्हणताय तसच शेवटी हातावर गोन्दवायची वेळ येऊन ठेपेल कि "आम्हाला लग्ना साठी मुलगी/बाई द्या हो" म्हणून
Post a Comment